|
|
लिओनार्दो चित्रकार आणि शिल्पकार म्हणुन प्रसिध्द असला तरी
त्याच्या बुध्दीला अगणित पैलु होते. तो वास्तुज्ञ होता,
अभियंता होता. यंत्राविषयी त्याला विलक्षण जाण नि आदर.
हाडाचा कलावंत असुनही यंत्रासारख्या विषयात त्याला
आतोनात रस होता. नाना प्रकारच्या यंत्राचे आराखडे त्यानं
काढुन ठेवलेले होते. ती कशी असावीत यांची अतिशय बारकाईची
चित्रे रेखाटलेली. जिवंतपणी त्यानं ती सर्व करुन पाहिली
नाहीत, पण त्याच्याविषयी आदर आणि कुतुहल असणाऱ्या
शास्त्रज्ञांनी ती अगदी अलिकडे, म्हणजे विसाव्या शतकात ती
करुन पाहिली. नवल म्हणजे ती सगळी चालतात. सोळाव्या शतकात
ती अस्तित्वात आली असती, तर मानवी प्रगती कितीतरी आधी घडली
असती.
बांधकामशास्त्र त्याला चांगल अवगत होतच पण त्याला
पाणीविषयक तंत्राची अतोनात ओढ होती. नव्हे, पाण्याचं वेड
होतं त्याला. यंत्राच्या आधारावर पाणी वरखाली कसं खेळवावं
याबद्दलचे त्याचे विचार चक्रावुन सोडतात. तेव्हा विजेचा
शोध नव्हता. वाफेची शक्ती अज्ञात होती. केवळ कप्प्या,
पट्टे आणि स्क्रू यांच्या सहाय्याने त्यानं केलेल्या
यांत्रिक रचना थक्क करुन सोडतात. पाण्यावर पुर्ण
स्वयंप्रेरित असा कपडे विणायचा माग त्यानं तयार केला.
त्याच्यानंतर तीनशे वर्षांनी औद्योगिक क्रांती झाल्यावर हे
यंत्र अस्तित्वात आले. त्याच्या सर्व कल्पना अशा काळाच्या
पुढे धावणाऱ्या होत्या.
नदीवर तात्पुरत्या पुलाचं बोटीला बोट लाऊन केलेलं सुंदर
डिझाइन त्यानं केलं होतं. नंतरच्या काळात कितीतरी
किल्ल्यांचे खालीवर होणारे पुल त्यावर बेतले होते. पाणी
म्हणजे जीवन. अनेक वर्षांच्या सखोल संशोधनानंतर त्याला
त्याचे गुणधर्म नीट कळले. ते कसं मिळवावं, खेळवावं,
अडवावं, जिरवावं याची जाण आली. दलदलीतल्या पाण्याचा उपसा
करुन दुर्भिक्ष असलेल्या जागी ते कसं न्यावं याचा अभ्यास
करुन त्यानं वस्तीसाठी जमिनी मिळवल्या. नदीचं गढुळ पाणी
दगडातुन नेऊन सबंध मिलान शहराला स्वच्छ पाणी कसं पुरवता
येईल याबद्दल त्यानं आराखडा तयार केला होता. तो तसा
उपयुक्त तर होताच, नयनरम्यही आहे.
त्यात शहराच्या भोवती मोठा तट होता. आत एक रस्ता जमीनीचा.
लगत एक पाण्याचा. दोन्हीतुन वाहतुक चालु. अँम्स्टरडॅमला
किंवा व्हेनिसला जे समुद्रामुळे साधलं ते हा वीर
जमीनीवरच्या या शहरासाठी करणार होता. त्यानं वरखाली दुहेरी
रचना केली होती. पाण्यातुन बोटी आणि वरती पादचारी माणसं.
त्यात उड्डान पुलांचीही व्यवस्था. काळाच्या फारच पुढची
असलेली ही योजना फलद्रुप झाली नाही तरी तिच्यावरुन
त्याच्या बुध्दीची झेप कळते. त्याचं द्रष्टेपण भविष्यात
कुठेना कुठे सर्वांना उपयोगी पडलंय.
दुषित पाण्यासंबंधीही त्याला चांगली समज होती. प्लेग,
विषमज्वर, कॉलरा अशा रोगांच्या साथी आल्या की त्य फैलावु
नयेत म्हणुन पाणी शुध्द करायला हवं हे जंतुंच्या शोधाआधी
तो जाणुन होता. शहराच्या पाणीव्यवस्थेची तशीच आखणी केलेली
होती. मलेरिया संपवण्यासाठी वाहतं पाणी आवश्यक आहे, हेही
त्यानं लक्षात घेतलं होतं.
असल्या रुक्ष विषयांबद्दल विचार करताना त्याच्यामधला रसिक
जागाच होता. लोकांसाठी मिलानमध्ये त्याला नंदनवन उभरायचं
होतं. सांडपाण्यावर बाग फुलवायची होती. पाणशक्तीच्या
जोरावर झाडं वाढवायची. खालच्या पाण्यात बारकाईने निवडलेले
मासे सोडायचे. पाण्यातील घाण खातील, पण स्वत: घाण करणार
नाहीत नि इतर माशांना खाणार नाहीत असे. त्या शास्त्रातलाही
तो ज्ञानी. वरुन तांब्याची जाळी. आत सुंदर पक्षी नि
फुलपाखरं उडताहेत. पक्षांची किलबिल चाललीय. पाणी झिलमिल
वाहतंय. कर्णमधुर वाद्यसंगीत ऎकु येतंय. फुलांचा सुगंध
दरवळतोय. शांत, रम्य वातावरणात मिलानचे रहिवासी आनंदाने
विहरताहेत असं त्याचं आगळंवेगळं स्वप्न होतं. या पाठची
शक्ती मात्र केवळ दलदलीतलं पाणी.
दुर्दैवानं ही योजनादेखील कागदावरच राहिली तरी त्याची
कल्पक रसिकता प्रकर्षाने दिसते. तो म्हणतो, " मानवी
जीवनासाठी चार महाभुतं आवश्यक. त्यात भुमी आणि पाणी ही दोन
जड. पण पृथ्वी स्थिर, पाणी अस्थिर. नेहमी चळवळ करीत असतं.
मग ते भुमीवर असो, वा तिच्या पोटात. ते जेव्हा समुद्राला
जाऊन मिळेल, तेव्हाच ते स्थिरावतं. तरी तिथुनही त्याची वाफ
होत रहाते. त्याचं चलनवलन चालुच रहातं. त्याची स्थित्यंतरं
अजब. उष्णतेने त्याची वाफ होते, थंडीने बर्फ. वास, रंग,
रुप काही नसताना ते म्हणाल ते रुप धारण करतं. निसर्गात अशी
दुसरी गोष्ट नाही. पाण्याचा चिमुकला स्रोतही मानवावर मात
करत असतो."
त्रिकालबाधित सत्य सांगणारी अगदी साधी, सोपी भाषा.
लिओनार्दो कुणी मान्यवर लेखक नव्हे. पण त्यानं अशी शेकडो
पानं लिहुन ठेवलेली आहे. सामान्य माणसाला रुचेल, पचेल,
समजेलसं त्याचं भाष्य पाहिलं की हा उत्तम लेखकही आहे, हे
उमजतं. वास्तु स्थापत्य अभियंता, खगोलशास्त्रज्ञ,
प्राणीशास्त्रज्ञ, मानवी शरीररचनेचा ज्ञाता, माणसाला उडता
येण्याची स्वप्न पहाणारा, तशी विमानं शोधणारा, संगीतज्ञ
आणि सर्वोत्तम चित्रकार. त्याचं ’मोनालिसा’ हे जगातलं
सर्वश्रेष्ट चित्र समजतात. अशी अथांग सर्वगामी बुध्दी
असलेला हा महामानव.
स्वत: अतिशय हुशार, बहुश्रुत असा मायकेल फॉक्स हा नेहमी
म्हणे की, "केवळ इटलीत नव्हे तर सबंध जगात आजवर
जन्मलेल्या सर्व माणसांमध्ये सर्वात बुध्दीमान मानव
शोधायचा झाला तर फक्त लिऒनार्दो दा विंची कडे बोट दाखवायला
पाहिजे."
For More Info:
1)
http://en.wikipedia.org/wiki/Leonardo_da_Vinci
2)
https://www.artsy.net/artist/leonardo-da-vinci
|