कथा माझ्या यशाची... नव्हे संघर्षाची.

 

 The dictionary defines success as '... favorable termination of a venture...the degree or measure of attaining a desired end...an undertaking that succeeds or confers success...succeeding fully or in accordance with one's desires' (Babcock, 1993).
      संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याकरिता माझ्या यशोगाथेबाबत विचारणा झाली तेव्हा मी क्षणभर अंतर्मुख झालो, विचार करु लागलो. सर्वच यशस्वी लोक आपली यशोगाथा का लिहित नाही? कदाचित संकोच अथवा अतीविनयशीलता किंवा अतीव्यस्थता ही त्यामागील कारणे असावीत. पण मला मात्र प्रदीर्घकाळ माझे वर्ग मित्र, वरिष्ठ, कनिष्ठ तसेच लाभलेला प्राध्यापक वर्ग यांच्यासोबत संवाद साधण्याची संधी मिळाली आणि हीच हा लेख लिहिण्यामागची खरी प्रेरणा होय. खरं म्हणजे हा लेख माझ्या यशापेक्षा अपयशाने मला कसे घडवले यावरच अधिक भर देतो. बनॉर्ड शॉ म्हणतात, "काहीही न करता घालवलेल्या जीवनापेक्षा चुका करीत वाटचाल करणे केवळ उपयुक्तच नव्हे तर सन्माननीयही आहे." मला वाटते आपण यशापेक्षा अपयशातुनच अधिक शहाणे होतो. आपण काय करु नये, यातुनच काय करावे याचा शोध घेत असतो आणि जो कधी चुकला नाही त्याला यशोमार्गही सापडला नाही.
      अरे हो! माझी ओळख द्यायला विसरलोच की! मी प्रविण कोल्हे, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावी एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म आणि तेथेच माझे संगोपन झाले. सन २००४ मध्ये संगमनेर येथील अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातुन मी स्थापत्य अभियंता म्हणुन पदवी प्राप्त केली. तत्पुर्वी सन १९९९ मध्ये मी या महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि इतरांप्रमाणेच पहिल्या वर्षी मीही महाविद्यालयीन जीवनाचा पुरेपुर ’आस्वाद’ घेतला! परिणाम व्हायचा तोच झाला. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत मी अव्वल क्रमांक पटकाविला! हेच माझ्या जीवनातील पहिले अपयश. याच अपयशाने मला गंभीरपणे आत्मचिंतनास प्रवृत्त केले, विधायक दृष्टी दिली. उर्वरित वर्षात मात्र प्रथम वर्षात माझ्या हातुन घडलेल्या चुका मला उमजल्यात. त्यातील प्रमुख होत्या : स्वत:ची क्षमता न ओळखणे आणि आत्मविश्वासाचा अभाव. मी अनुत्तीर्ण झालो कारण मला इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रानिक्स इंजिनिअरिंग या विषयात मुळी रसच नव्हता. स्थापत्य अभियंता म्हणुन मला या विषयांचा काय उपयोग होईल याचा मी कधी गांभीर्याने विचारच केला नव्हता. पण जेव्हा माझ्या हे ध्यानात आलं तेव्हा माझी मानसिकता बदलली. जर पदवी मिळवण्यापुर्वी या विषयात उत्तीर्ण व्हावे ही विद्यापिठाचीच मागणी असेल, तर त्यांच्या विद्वत्तेवर शंका घेणारा मी कोण? म्हणुन मी पुनश्च नामांकन केले आणि याचवेळी सुदैवाने मला काही ’देवदुत’ भेटलेत. ज्यांना माझे मित्र ’शिक्षक’ म्हणायचे. त्यांच्याच मार्गदर्शनामुळे मी अभ्यासात एकाग्र झालो. मला वाटते हाच माझ्या जीवनाला कलाटनी देणारा क्षण होय. त्रागा आणि वितंडवाद यात वेळ घालविण्यापेक्षा मी तन्मयतेने अभ्यास केला, परिश्रम घेतले आणि ह्यावेळी मात्र मी उत्तीर्ण झालो.
      प्रथम वर्षाच्या अपयशानंतर मला खरी प्रेरणा मिळाली ती डॉ. नरेंद्र जाधव (जे पुणे विद्यापिठाचे कुलगुरु होते) यांनी लिहिलेल्या ’आमचा बाप अन आम्ही’ या मराठी पुस्तकाने. दुसऱ्या वर्षात मी वर्गातुन प्रथम आलो. ही जादु याच पुस्तकाची आणि हीच अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील माझी पहिली यशस्वी वाटचाल. तिसऱ्या वर्षी मी महाविद्यालयात प्रथम, तर अंतिम वर्षी पुणे विद्यापिठात प्रथम येऊन सुवर्णपदकाचा मानकरी ठरलो. आतापर्यंत हेच माझ्या जीवनातील सर्वोच्च यश होते. वळुन पहाताना मागील खडतर प्रवास आठवतो तर काही निराशाकारक प्रसंगही आठवतात. मला वाटते निराशादेखील जीवनात आवश्यक असते, कारण तीच पुढे सरसावण्यासाठी उमेद देते आणि शेवटी यशाचे निमित्त ठरते. कदाचित याच कारणामुळे मी चार वर्षीय अभ्यासक्रम पाच वर्षात पुर्ण केला. पण वाया गेलेल्या ’त्या’ वर्षाविषयी मला जराही खंत वाटत नाही. कारण त्याच वर्षाने मला भरारी घेण्याची उर्जा दिली.
      अभ्यासाव्यतिरिक्त मी सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमात सहभाग घेतला. त्यासाठी मला प्रा.काकडे सरांनी प्रेरीत केले. महाविद्यालयातील भित्तीपत्रक-साहित्य शारदाचा विद्यार्थी समन्वयक म्हणुन मी काम करु लागलो. ही माझी पहिली अभ्यासेतर कामगिरी. पुढे एन.एस.एस. चा सचिव झालो आणि नियमित उपक्रमासोबतच १० दिवसांचा महाविद्यालयाबाहेरील हिवाळी शिबिराचा आस्वाद घेतला. हळुहळु अशा उपक्रमात मी अधिकाधिक सहभागी होऊ लागलो. थोडक्यात, अंतिम वर्षात जाईपर्यंत मी महाविद्यालयातील सर्वात व्यस्त व्यक्ती म्हणुन ओळखला जाऊ लागलो. साहित्य शारदाचा मुख्य समन्वयक, एन.एस.एस. चा सचिव, महाविद्यालयीन वार्षिकांकाचा प्रमुख संपादक आणि महाविद्यालयाचा जनरल सेक्रेटरी अशा सर्व जबाबदाऱ्या हाताळताना माझ्या सृजनशीलतेला खुलवणाऱ्या मर्यादांची मला जाणीव झाली. ’सृजनशीलता ही उत्स्फुरता आणि मर्यादा यांच्यातील तणावामुळे निर्माण होते, असा माझा विश्वास आहे. मर्यादा नदीच्या काठासारख्या असतात. त्या उत्स्फुरतेला विविध दिशा देतात, ज्या आपल्याला यशाकडे घेऊन जातात.’ सन २००४ हे वर्ष माझ्यासाठी सर्वात यशस्वी आणि आनंददायी ठरले. जेव्हा जेव्हा मी तेव्हाची फोटो बघतो, तेव्हा मी त्या सोनेरी दिवसांच्या आठवणीत रमुन जातो.
      माझी बॅच खरोखरीच भाग्यवान होती. कारण पाच वर्षात आम्हाला चार कर्तृत्ववान प्राचार्यांचे मार्गदर्शन लाभले. प्रथम प्राचार्य डॉ. रघुवीरसिंग सरांनी आमच्या अंगी शिस्त बाणवली, प्राचार्य डॉ. ए.व्ही. वलवडे यांनी सतत विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर भर दिला. पुढे डॉ. जे.पी. जॉर्ज सरांनी वक्तशीरपणाचा पाठ दिला. ते नेहमी दुसऱ्यांना वेळ देण्यात अधिक महत्व देत होते. डॉ. जॉर्ज सर हेच माझे प्रेरणास्रोत होय. त्यांनी मला भरभरुन मदत केली आणि शेवटी डॉ. पाटील सरांनी प्राचार्य पद भुषविले. म्हणुनच मला माझी बॅच सुदैवी होती असे वाटते, कारण आम्ही त्यांच्याकडुन खुप शिकलो, त्यांची तत्वे जीवनात अंगिकारण्याचा प्रयत्न करु लागलो.
      सन २००४ मध्ये पदवीधर होताच मी व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश केला. प्रथम पुण्यातील एका खाजगी कंपनीत कनिष्ट अभियंता म्हणुन मी पदवीचे प्रमाणपत्र हातात येण्यापुर्वीच रुजु झालो. साईटवर काम करीत असताना मला उच्चशिक्षणाचे महत्व जाणवु लागले. शिक्षणाने बुध्दीमत्ता विकसित होते आणि बुध्दीमुळेच माणुस इतर प्राणीमात्रांपेक्षा वेगळा ठरतो. निसर्ग आणि स्रोतांचा सुयोग्य वापर करुन मानवी जीवनाचे कल्याण आणि सुधारणा करण्यासाठी शिक्षणच त्याला समर्थ बनविते. आधुनिक जीवनाचा चांगुलपणा आणि पुर्णत्वाची किल्ली म्हणजे शिक्षण. म्हणुनच उच्च शिक्षणाची कास धरावी या हेतुने मी ’गेट’ या राष्ट्रीय स्तरावरील परिक्षेची माहिती करुन घेतली आणि त्या परिक्षेची तयारी करण्याचे ठरवले. योगायोगाने त्याच वेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील अभियांत्रिकी सेवा परिक्षेची घोषणा केली. मी प्राचार्य डॉ. जॉर्ज सर आणि श्रीमती मनिषा जॉर्ज मॅडम यांच्या मार्गदर्शनात दोन्ही परिक्षांसाठी अर्ज केला. मला आजही तो दिवस आठवतो, जेव्हा मी सरांना शुल्काविषयी विचारणा केली, तेव्हा ते एवढेच म्हणाले, "Don't worry about fees, only concentrate on your study." चणचणीच्या काळात त्यांच्या या शब्दाने माझे नैतिक बळ वाढवले. फेब्रुवारी महिण्यामध्ये आठवड्याच्या फरकाने असलेल्या ’गेट’ व ’महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षा’ या दोन्ही परिक्षा मी दिल्या. मार्च २००५ मध्ये गेटचा निकाल लागला. ज्यात मला पहिल्याच प्रयत्नात ९५.५० टक्के गुण मिळाले. उच्चशिक्षणाच्या प्रवेशाच्या दृष्टीने भारतातील सर्वोत्तम असलेल्या आय.आय.टी. मध्ये मुलाखतीस जाणे आवश्यक होते. महाराष्ट्राबाहेर जाण्याची ही माझी पहिलीच वेळ. मी आय.आय.टी. कानपुर येथे पहिली मुलाखत दिली, आणि मी एम. टेक. प्रवेशासाठी निवडला गेलो. त्यानंतर मी आय.आय.टी. मुंबई येथे देखील निवडला गेलो. पण कानपुरच्या एकंदरीत कार्यप्रणालीने मी प्रभावित झालो, आणि मी तेथेच प्रवेश Transportation System Engineering या विषयात एम.टेक.साठी प्रवेश घेतला. माझा हा निर्णय योग्य असल्याचा प्रत्यय मला त्यानंतर लवकरच आला.
      कानपुरला माझी शैक्षणिक वाटचाल सुरु होताच माझ्या ध्यानात आले की, येथील बहुतेक विद्यार्थी आपापल्या विद्यापिठात ’टॉपर’ होते. अर्थातच स्पर्धा तीव्र होती. पण माझी स्पर्धा मात्र स्वत:शीच होती. कालच्यापेक्षा आज मी अधिक चांगलं करण्याचाच सदैव प्रयत्न केला. उत्तमोत्तम यश म्हणजे अखंड प्रवास, मुक्काम नव्हे, अशी माझी धारणा आहे. कदाचित याच विचारसरणीमुळे असावे, मी कानपुरला ट्रान्सपोर्टेशन सिस्टिम इंजिनिअरिंगमध्ये द्वितीय आलो. ’मोठ्या गोष्टी साध्य करताना केवळ स्वप्नच नव्हे तर ती सत्यात उतरवण्यासाठी कृतीही करावी लागते. केवळ योजनाच नव्हे तर स्वत:वरही विश्वास असावयाच हवा. आय.आय.टी. कानपुरने केवळ संबंधित विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त करण्याची अद्ययावत विचारसरणीच दिली नाही तर माझा आत्मविश्वासच वाढविला. येथे मी अनेक विश्वविख्यात व्यक्तिमत्वांच्या संपर्कात आलो. प्रा. के. देब हे त्यापैकीच एक. ज्यांना सन्माननीय पंतप्रधानांनी सन २००५ मध्ये ’शांतीस्वरुप भटनागर’ पुरस्काराने भुषविले. त्यांनीच मला ’जेनेटिक अल्गोरीदम’ या क्षेत्राची आवड निर्माण होण्यास प्रेरणा दिली आणि मी ’ऑप्टीमायझेशन इन इंजिनिअरिंग डिझाइन’ हा विषय निवडला. अत्यंत व्यस्त जीवन असुनदेखील त्यांनी आपला तास कधी चुकविला नाही,  अथवा एखादा मुद्दा वारंवार समजावुन देण्याचा कधी कंटाळा केला नाही.
      पुढे ज्यांच्या विचारांनी मी भाराऊन गेलो, ते व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. ई.श्रीधरण. ’द मेट्रोमॅन’, एम.डी. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन, नवी दिल्ली येथे एका अनौपचारिक उन्हाळी शिबिरात त्यांनी दोन तास आम्हांसोबत घालवले आणि एक अंतर्मुख करणारा विचार दिला, नव्हे एक नवी दृष्टी दिली. ’अंधाराची कुरकुर करण्यापेक्षा दिवे प्रज्वलित करा’ असा त्यांचा संदेश आणि  स्वत:सोबतच आपल्या देशाच्या विकासासाठी देखील आपण झटायला हवेत हे त्यांचे विचार मनात रुजले.
      दिनांक २० जुन २००७ हा दिवस माझ्या आयुष्यात अविस्मरणीय ठरला. आय.आय.टी. कानपुरने आयोजित केलेल्या ’समर कॅंप’ च्या निमित्ताने मला देशाचे सर्वोच्च स्थान असलेल्या राष्ट्रपती भवनात प्रवेश करण्याची संधी मिळाली. त्याहुनही महत्वाचे म्हणजे तत्कालीन राष्ट्रपती मा. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्याशी सुसंवाद साधण्याची संधी मिळाली. दक्षिण भारतातील रामेश्वरम पासुन दिल्लीतील सर्वोच्च पदी विराजमान होण्याचा बहुमान ज्यांनी केवळ आपल्या गुणवत्तेच्या व कठोर परिश्रमाच्या जोरावर मिळवला, अशा ए.पी.जे. अब्दुल कलाम या शास्त्रज्ञाने आम्हाला देशसेवेची प्रेरणा दिली. मी स्वत:ला भाग्यवान मानतो कारण आपल्या देशाच्या विकासकार्यात सहभागी होण्याची संधी मला लाभली. फेब्रुवारी २००५ मध्ये दिलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परिक्षेचा निकाल लागला आणि मी सबंध महाराष्ट्रात जलसंपदा विभागात प्रथम आलो. सप्टेंबर २००७ मध्ये मी सहायक कार्यकारी अभियंता या पदावर जलसंपदा विभागात रुजु झालो. मला वाटते हेच माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम यश, मात्र वर उल्लेखल्याप्रमाणे ’Success is a journey and not a destination' हे लक्षात ठेऊनच मला पुढची वाटचाल करायची आहे.
      आतापर्यंत मिळवलेले हे यश साध्य होऊ शकले ते अमृतवाहिनी महाविद्यालयातील मजबुत पायाभरणीमुळे आणि आय.आय.टी. कानपुर येथे मिळालेल्या विधायक दृष्टीमुळे. या सर्व वाटचालीमध्ये मी एवढे मात्र शिकलो की, यशाची मोजदाद ही व्यक्ती आपल्या जीवनात कोणत्या पदावर पोहचला यावर ठरत नसुन त्याने ते यश मिळवताना कोणकोणत्या अडचणींवर मात केली हेच अधिक महत्वाचे.
      मी हा जो लेख प्रपंच केला आहे तो केवळ माझ्या यशाच्या फुशारक्या मारण्यासाठी नव्हे, तर चिंता, संकोच आणि न्युनगंडामुळे पछाडलेल्या गरीब विद्यार्थ्यांना यापासुन नवीन उत्साह व आत्मविश्वास लाभावा हीच यामागची तळमळ आहे.
      हा लेख लिहिण्यासाठी मला प्रवृत्त करणारे अमृतवाहिणी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विश्वस्थ, प्राचार्य, व्यवस्थापक, प्राध्यापक गण, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी या सर्वांचे मी अभिनंदन करतो, मन:पुर्वक आभार मानतो. महाविद्यालयाची २५ वर्षांची यशस्वी वाटचाल बघता संस्थेचे संस्थापक आदरणीय भाऊसाहेब थोरात यांचे स्वप्न साकार झाल्याचे समाधान वाटते.
      मला ज्यांनी घडवले, प्रेरणा दिली, प्रसंगी त्याग केला, त्यांचा उतराई न झाल्यास मला वाटते हे मनोगत अपुर्णच राहिल. माझे आजी आजोबा-सीताबाई व रंगनाथ, माझे आई बाबा-रोहिणी व शिवाजी, माझे काका काकु-रावसाहेब व राधा आणि माझा भाऊ प्रशांत यांच्यामुळेच आज मी इथवर येऊन पोहचलो. खरं म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्यास शब्द थिटे पडतात. माझे गुरुजन, ज्यांनी मला कठोर परिश्रम व शिस्तीचे धडे दिले, माझा मित्रपरिवार आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या यशात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष हातभार लावला त्या सर्वांसर्वांच्या ऋणातच मी राहु इच्छितो.
 
Water Resources  Civil Engineering Notes  Aamhi Sangamnerkar  Books
© 2006~13 Pravin Kolhe
 
Page Last Updated on 12-02-2014 11:43:53